Saturday, July 20, 2013

किमयागार कमल पक्षी

डॉ. सतीश पांडे


सेंट पीटर नावाचा ख्रिश्‍चन संत पाण्याच्या पृष्ठभागावरून चालत गेला अशी एक आख्यायिका आहे. आध्यात्मिक बळाने या महात्म्यास अशी विलक्षण शक्ती प्राप्त झाली असावी असे पापभिरू लोक समजतात. हल्लीच्या जगात पाप इतके वाढले आहे की, पाण्यावर चालण्याची शक्यता जवळजवळ नाहीच असे म्हणता येईल.

पण पुण्यलोकातील एक पक्षी मात्र अशी जादू कलियुगातदेखील करून दाखवतो. हा पुण्यलोक म्हणजे अद्वितीय असा ‘कमल पक्षी’. कमळाच्या पसरट व पाण्यावर तरंगणार्‍या पातळ पानांवर लीलया चालणारा म्हणून त्याला ‘कमल पक्षी’ म्हणतात. इंग्रजीतदेखील याच अर्थाचे नाव या पक्ष्याला मिळाले आहे - ते म्हणजे ‘लिली ट्रॉटर’. जगात विविध ठिकाणी राहणारे लोक साहजिकच अशा पक्ष्याच्या विलक्षण सवयींमुळे भारावून जातात व त्या अर्थाची नावे देतात.

‘कमल पक्षी’ काही संतमहात्मा नाही. त्याने आध्यात्मिक उंची गाठली असली तरी त्याचे अनुमान आपण कसे लावणार? असो, पण कमल पक्षी एका अर्थाने पाण्यावर चालतो यामागे एक साधे शास्त्रीय कारण मात्र आहे. जेव्हा कमल पक्षी कमळाच्या नाजूक व पाण्यावर तंरगणार्‍या पानावर उभा राहतो तेव्हा त्याचे वजन त्या पानावर एका ठिकाणी पडत नाही. त्याचे कारण असे आहे की, कमल पक्ष्याच्या पायांची सगळी बोटे अतिशय लांबलचक असतात. त्याच्या चोचीपासून शेवटीच्या टोकापर्यंतची लांबी जेवढी असते त्यापेक्षा थोडी अधिक लांबी त्याच्या बोटांची असते. म्हणजेच आधीच वजनाने कमी असणारा कमल पक्षी जेव्हा उभा राहतो, तेव्हा कोणत्याही एका ठिकाणी त्याच्या एकूण वजनाचा फारच थोडासा भाग पडतो. म्हणूनच कमळाचे पान त्याच्या वजनाने बुडत नाही. कमल पक्षी पानावरून चालताना पटपट चालतो म्हणून वजनाचा सर्व भार पानावर येण्याच्या आधीच त्याने मागचा पाय पुढे टाकलेला असतो. कमल पक्षी किमयागार आहे!

साधारणपणे याच शास्त्रीय माहितीचा उपयोग करून माणूसदेखील ‘वॉटर स्की’ व ‘स्नो स्की’ हे खेळ यशस्वीपणे उपभोगतो. वरकरणी जादूचे प्रयोग वाटणारे अनेक आविष्कार शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित असतात. आपला कुशल ‘कमल पक्षी’ पाण्यावरून चालण्याची किमया करतो, पण त्याला त्यामागचे शास्त्रीय कारण कळत असेल का? विचार करा...

(इला फाऊंडेशन)

सौजन्य:- फुलोरा, सामना १ ९ ० ७ १ ३

No comments: