Tuesday, December 25, 2012

इंटरनेट सेफ्टी

इंटरनेट वापरताना अचानक मधेच एखाद्या जाहिरातीचा किंवा एखाद्या चांगल्या ऑफरचा पॉप अप आपल्यासमोर प्रकट होतो व आपण काहीएक विचार न करता थेट अशा पॉप अपवर क्लिक करतो व त्यानंतर त्यांच्या जाहिरातवजा संकेतस्थळावर आपल्या माहितीची नोंद करून जाहिरातदाराच्या फोन किंवा ईमेलची वाट बघत बसतो. परंतु सावधान! इंटरनेटवरील अशा पॉप अपरूपी प्रकटणार्‍या जाहिरातींना ऍडवेयर असे म्हणतात व अशा बहुतांशी जाहिरातींचा उद्देश हा तुमची ‘आयडेंटिटी थेफ्ट’ अर्थात तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी करणे असा असतो.
- आयडेंटिटी थेफ्ट- मोबाईल क्रमांक, ई-मेल ऍड्रेस, बँक अकाऊंट नंबर किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक ही आपली गोपनीय माहिती असते. सराईत हॅकर्स ऍडवेयरचा वापर करून सहजपणे या माहितीची चोरी करू शकतात. यालाच ‘आयडेंटिटी थेफ्ट’ असे म्हणतात. माहितीचा दुरुपयोग टाळण्यासाठी नेटवरील ‘ऍडवेयर’वर आपली वैयक्तिक माहिती शेयर करण्याचे टाळावे. चांगली वेबसाईट किंवा खात्रीवजा प्रॉडक्ट असेल तर त्या कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाला फोन करून जाहिरातीची खातरजमा करून अशा संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- मॅन इन द मिडल - ऍडवेयरचा वापर करून सराईतपणे तुमचा ई-मेल,ऑनलाईन बँक अकाऊंट, कोणत्याही ऑनलाईन सेवेमध्ये तुम्हाला माहीत नसताना बेमालूमपणे हॅक करण्याचा हा नवीन प्रकार आहे. मॅन इन द मिडल म्हणजे जेव्हा तुम्ही अशा कोणत्याही ऍडवेयरवर क्लिक करता तेव्हा संगणकातील इंटरनेट ब्राऊसरमधील सर्व माहिती ‘ऍडवेयरवरील’ संगणकावर नोंद होते व इंटरनेट ब्राऊसरमधील ‘कुकीज’चा वापर करून हॅकर्स थेट ऑनलाईन सेवेचा ताबा घेतात.
- स्पायवेयर/मालवेयर - इंटरनेट वापरताना आपल्यासमोर ‘मोस्ट गुड स्क्रीनसेव्हर्स’ किंवा ‘अमेझिंग वॉलपेपर्स’सारख्या सुंदर चित्रे असणार्‍या जाहिराती झळकतात व आपण चांगले स्क्रीनसेव्हर्स किंवा वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करतो. ते् इन्स्टॉल झाले की आपल्या संगणकात ते एक ठरावीक प्रोग्राम इन्स्टॉल करतात. हा प्रोग्राम दर ठरावीक वेळेला आपल्या संगणकात होत असलेल्या सर्व नोंदी ‘ऍडवेयरच्या’ मुख्य संगणकापर्यंत इंटरनेटवरून पाठवत राहतो. मग या माहितीचा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे इंटरनेटवर जाहिरातीमधून आलेल्या स्क्रीनसेव्हर वॉल पेपर्सपासून दोन हात दूरच राहणे केव्हाही चांगले.
ऍडवेयरपासून बचाव- ऍडवेयरपासून बचाव करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तुमच्या इंटरनेट एक्स्प्लोररमधील ‘पॉप अप ब्लॉकर’चा वापर करणे. त्यासाठी इंटरनेट एक्स्प्लोरर - प्रॉपर्टीज - प्रायव्हसी - टर्न ऑन पॉप अप ब्लॉकरवरील टीक काढून टाकणे. यामुळे तुमच्या संगणकातून कोणत्याही संकेतस्थळावरील पॉप अप कायमच्या बंद होतील. जर तुम्हाला काही विशिष्ट संकेतस्थळावरील पॉप अप बघायच्या असतील तर याच ऑप्शनमधील ‘अलाऊ वेबसाईट’चा वापर करून त्या संकेतस्थळावरील पॉप अप बघू शकता.
- कुठल्याही संकेतस्थळावरील ‘पॉप अप’वर आपल्या वैयक्तिक माहितीची नोंद करू नये.
- इंटरनेट एक्स्प्लोररमधील स्मार्ट स्क्रीन फिल्टर व क्रॉस साईट स्क्रिप्टिंग फिल्टरचा वेळोवेळी वापर करीत रहा.
- इंटरनेट एक्स्प्लोरर तसेच विंडोज संगणकप्रणालीचे लेटेस्ट पॅचेस वेळोवेळी अपडेट करीत रहा.

सौजन्य :- फुलोरा, सामना २२१२१२

No comments: