Sunday, April 22, 2012

कॉर्पोरेट मंत्र - थँक्स डियर

चांगले झाले की आपल्यामुळे आणि वाईट झाले की दुसर्‍यामुळे हे सर्वांनाच वाटते. दुसर्‍याकडे बोट दाखविणे सोपे असते. स्वत: आपल्या जीवनाची जबाबदारी झेलणे कठीण. एक मुलगी होती. अनाथआश्रमात लहानपण घालवून तिने स्वत:ला उभे केले. समोर येईल तो दिवस हसत घालविण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती रडत बसली. शिक्षण पूर्ण केले. नाव कमावले. लोकांना ती आवडू लागली. स्वत:साठी तिने समाजात एक स्थान निर्माण केले. पुढे तिच्या मनात कुठेतरी अन्यायाची भावना दरवळत होती. तिला सतत वाटत होते की, आपल्या आई-वडिलांनी, समाजाने, देवाने अन्याय केला आहे. याच दु:खात ती सतत जळत. एकेदिवशी तिला तिची एक जुनी मैत्रीण भेटली. श्रीमंत आई-वडिलांची ही पोरगी शिकली नाही व काहीच करत नव्हती. तिची ही अवस्था आश्‍चर्यजनक होती. सगळं काही हाताशी मिळाल्यामुळे आपली मैत्रीण वाया गेली हे तिच्या लक्षात आले. आपण स्वत:च्या पायावर उभे असल्याचा तिला अभिमान वाटला. प्रत्येक मोठा झालेला माणूस फार मोठ्या अन्यायाचा मालक असतो. तुम्ही नीट विचार करा. जगात झालेले सर्व चांगले बदल, क्रांती व मोठी माणसं ही अन्यायातून जन्माला आली. आपल्यावर अन्याय होत आहे. या विचाराने दबून जाऊ नका. उलट आपण यशाच्या महामार्गावर आहोत हे समजून जा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी, सावरकर, टिळक, जीजस यांच्या आयुष्यात अन्याय नसता तर ते कुणीच झाले नसते. कॉर्पोरेट जगतात रोज अन्यायाचा पाऊस पडतो. कधी बॉसकडून, कधी सहकार्‍यांकडून, कधी कधी घरचेही अन्याय करण्यात कसर ठेवत नाहीत. अशावेळी निराश होऊ नका. त्यातून तुम्ही काय शिकू शकता ते पाहा. एकाने सुंदर लिहिले आहे :


‘‘तूमने सुली पे लटकते जीसे देखा होगा

वक्त आएगा वही शक्स मसीहा होगा।’’

तुमच्यावर अन्याय करणार्‍यांचे मन:पूर्वक आभार माना. तुम्हाला मोठं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असेल. अन्याय करू नका, पण तुमच्यावर कुणी केला तर म्हणा थँक्स डियर!!

सौजन्य:- सामना २२०४२०१२

No comments: