शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाई करणार्या रोबोचे प्रात्यक्षिक गुरुवारी पाहिले. सोबत महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे.
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) - संपूर्ण मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहचविणार्या रोबोने आज मिठी नदीची सफाईदारपणे सफाई केली. कोणत्याही दिशेला फिरत नदीतील कानाकोपर्यातील गाळ चुटकीसरशी उचलण्याचे प्रात्यक्षिक रोबोने दाखविल्याने सर्वच जण थक्क झाले. ३० कर्मचार्यांचे बळ असलेल्या रोबोने अवघ्या एका कर्मचार्याच्या मदतीने मिठी नदीतील गाळ उपसून काढला.
एल ऍण्ड टी, पवई पाइपलाइन, पवई यार्ड येथे आज शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अत्याधुनिक रोबो मशीनचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिठी नदीतील गाळ काढण्याचे प्रात्यक्षिक रोबोद्वारे दाखविण्यात आले. यावेळी महापौर सुनील प्रभू, शिवसेना विभागप्रमुख ऍड. अनिल परब, सुधीर मोरे, पालिका सभागृहनेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, उपविभागप्रमुख सुधाकर पेडणेकर, शाखाप्रमुख अरविंद शिंदे, नगरसेविका अश्विनी मते आणि अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता उपस्थित होते. रोबो नदीत उतरल्याबरोबर रोबो ऑपरेट करणार्या कर्मचार्याने वेगवेगळी बटणे दाबत संपूर्ण नदीत रोबोला फिरवत गाळ उचलायला सुरुवात केली. रोबोच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बकेटमध्ये कचरा जमा करून टेलिस्कोपिक बुम लांबपर्यंत नेऊन गाळ नदीबाहेर फेकण्यात आला. रोबोचे बुम, अंडर कॅरेज, लेग व व्हील्स हवे तिकडे वळविता येत असल्याने मिठी नदीतील गाळ सपासप बाहेर फेकला जात होता.
रोबो कुठे गाळ काढणार
या रोबोद्वारे पवई मिठी नदीतील धारावी-दादर नाला, ऍन्टॉप हिल येथील खास क्रीक नाला, टेक्स्टाइल नाला आणि जे. के. केमिकल्स नाल्यासह ज्या नाल्यांच्या सफाईचे काम कंत्राटदारांकडे नाही त्या नाल्यातील गाळ काढण्यात येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात किमान १० ते १२ नाल्यांची रोबोच्या सहाय्याने सफाई करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
- यंदा नालेसफाईसाठी ७५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. ह गेल्या वर्षी ३ लाख ९८ हजार मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. यंदा साडेचार लाख क्युबिक गाळ काढण्यात येणार आहे. ह पावसाळ्यापूर्वी ७० टक्के, पावसाळ्यात २० आणि पावसाळ्यानंतर १० टक्के नालेसफाई करण्यात येणार. ह नाल्यात रोबो उतरविणे, बाहेर काढणे सोयिस्कर आणि कमी खर्चाचे. त्यासाठी क्रेन येण्याची गरज नाही. ह रोबो नाल्यात नेण्यासाठी पाथवे, रॅम तयार करण्याची गरज नाही.
भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल!
राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही, अशी प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारता महाराष्ट्रात कुणाचे सरकार आहे? २६ जुलैचा हल्ला याच देवरांच्या मतदारसंघात झाला होता. त्यानंतर या खासदाराने काय केले, असा सवाल करतानाच केवळ मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला आणि मुख्यमंत्री बदलले गेले. या पलीकडे काहीच झाले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरले आहे. कारभारात हे सरकार संवेदनशून्य झाले असून घोटाळ्यात हे सरकार अव्वल नंबरवर असल्याची टीकाही त्यांनी केली. घोटाळ्यांमध्ये हे सरकार महाराष्ट्रात नंबर एक झाले की काय? असे दुर्दैवाने म्हणावे लागते, असे सांगतानाच ‘कॅग’च्या अहवालावर काही कारवाई करणार की नाही, असा खरमरीत सवालही त्यांनी केला.
...तर आणखी रोबो घेऊ
नदी आणि नाल्यांवर असलेल्या पुलांमुळे जिथे एखादी मशीन वा कामगार गाळ काढण्यासाठी पोहोचू शकत नाही. तिथे हा रोबो पोहोचून गाळ काढणार आहे. आज झालेल्या रोबोच्या प्रात्यक्षिकामुळे मी समाधानी आहे असे सांगून गरज पडल्यास आणखी रोबो मशीन घेतल्या जातील असे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही बांधिल आहोत असे सांगतानाच आधुनिक तंत्रज्ञान घेणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले.
आठ तासांत २४० घनमीटर गाळ
प्रचंड क्षमतेच्या या रोबोद्वारे आठ तासांत २४० घनमीटर गाळ काढता येणार आहे. या रोबोचा आठ तासांचा दर २४,१४५ रुपये आहे. मात्र एका महिन्याचे काम एका दिवसात करण्याची रोबोची क्षमता असल्याने पालिकेच्या महिनाभराच्या व इतर खर्चात बचतच होणार आहे.
सौ. सामना १४०४२०१२
No comments:
Post a Comment