Sunday, November 24, 2013

पराती मिसळचा चटका

संभाजीनगरचे ग्रामदैवत असणार्‍या राजाबाजार येथील संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी येथे नियमितपणे येण्याचे आणखी एक खास आकर्षण आहे. बाप्पाचा प्रसाद खाल्ल्यानंतर संभाजीनगरवासीयांची पाऊले आपोआप वळतात ती या ठिकाणची ओळख झालेल्या पराती मिसळ पाव या हॉटेलकडे. हॉटेल तसे छोटेखानीच आहे, पण गेल्या ६० वर्षांपासून या पराती मिसळचा चटका शहरातील चोखंदळ खवय्यांची तृष्णा भागवत आहे.
जुन्या संभाजीनगरचे साक्षीदार बाबुलाल पराती यांनी ६० वर्षांपूर्वी या दुकानाची सुरुवात केली. शहागंज हा सुरुवातीपासूनच गजबजलेला बाजारपेठेचा भाग. येथे कामानिमित्त जिल्ह्यातून दूरदूरहून लोक येत. पूर्वी येथेच बस स्टँडही होते. त्यामुळे काम आटोपताच खमंग मिसळ-पाव खाण्यासाठी लोक येथे गर्दी करायचे. सहा दशकांनंतरही ही गर्दी आहे तशीच आहे. मधले काही काळ हे दुकान बंद होते, पण खवय्यांच्या तीव्र मागणीवरून पराती कुटुंबीयांच्या पुढच्या पिढीने ते पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. शहराच्या खाद्य परंपरेचा हा वारसा बाबुलाल यांचे पुतणे अजय पराती चालवतात. काळानुरूप त्यांनी दुकानात थोडे बदल केले आहेत. जुने जाऊन चकाचक फर्निचर आले, पण मिसळीची चव आहे तशीच आहे.
फक्त ५ तासच खमंग मिसळआधुनिकतेच्या काळात आता २४ तास हॉटेल उघडे ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे, पण पराती मिसळ पाव केवळ ५ तासच उघडे असते. सकाळी ७ ते १२ अशीच याची वेळ आहे. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍यांचा नाश्ता येथेच होतो तर आपली प्लेट मिस होऊ नये यासाठी ग्राहकांच्या अक्षरश: रांगा लागतात. अजय यांनी पारंपरिक मिसळीशिवाय येथे काही नवीन पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. यात जैन समाजासाठी कांदा-लसूण नसणारी जैन मिसळ, कोल्हापुरी मिसळ, बटर मिसळ आणि दही मिसळचा समावेश आहे. याशिवाय समोसे, भजी, वडापाव हे पदार्थ आहेतच, पण यात ग्राहकांच्या उड्या पडतात त्या मिसळ पाववरच. मिसळीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे याचा रस्सा काळा आहे. इतर ठिकाणी लालभडक रस्सा पाहताच डोळ्यांतून पाणी येते, पण परातीच्या मिसळीचा काळा रस्सा तिखट तर आहेच पण याची चव दिवसभर जिभेवर रेंगाळते.


अजय परातीसंचालक, पराती मिसळ पाव.
संभाजीनगरची परंपरामधल्या काळात काही वर्षे मी नोकरी केली, पण काकांनी सुरू केलेला हा व्यवसाय मला स्वस्थ बसू देत नव्हता. अनेक जणांनीही हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा रेटा लावून धरला होता. त्यांच्या प्रेमामुळेच पुन्हा नवीन जोमात या व्यवसायात उतरलो. संभाजीनगरची खाद्यपरंपरा ठरलेल्या या हॉटेलला पूर्वीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळतोय, हेच आमच्या चवीचे यश आहे.

सौजन्य :- फुलोरा, सामना २४१११३

No comments: