Thursday, May 03, 2012

दहावीची पुस्तकं आता इंटरनेटवर

www.ssconline.inचे उद्घाटन करताना आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले आणि ऍडमॅन भरत दाभोळकर 

-‘फेसबुक’वर वेळ घालवण्यात तरबेज असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आता इंटरनेटवर दहावीची ‘टेस्टबुक’ही वाचायला मिळणार आहेत. डोईजड वाटणारा दहावीचा अभ्यास विद्यार्थ्यांना घरबसल्या कधीही त्यांच्या सोईनुसार करता येणार असून इंटरनेटच्या माध्यमातून ऍनिमेशनद्वारे भूमितीच्या आकृती, चित्ररूपातून मांडण्यात आलेले हिंदीतील धडे, मधुर चालींवर बांधलेल्या मराठीतील कविता आणि विज्ञानातील प्रयोगांचे प्रात्यक्षिक ssconline.in या वेबसाईटवर एका क्लिकवर शिकता येईल. आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्याहस्ते आज या वेबसाईटचे उद्घाटन झाले.


पुस्तक डोळ्यासमोर धरले की झोप येते, अशी तक्रार करणार्‍या विद्यार्थ्यांनी संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेले शिक्षण समजण्यास व लक्षात ठेवणे सोपे जात असल्याने मॅन्टोर ई-लर्निंगने ही वेबसाईट तयार केली आहे. अमित जठार यांनी ही वेबसाईट तयार केली असूून विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाची भीती दूर करण्यासाठी slap the stress या कॅम्पेनचीदेखील ऍडमॅन भरत दाभोळकर यांच्याहस्ते सुरुवात केली. दहावीला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे समुपदेशन, स्ट्रेस टेस्ट, विद्यार्थी-पालक-शिक्षक संवाद, मनोरंजनाव्दारे अभ्यास असे विविध उपक्रम यात राबविण्यात येतील.

- ssconline.in या साईटवर क्लिक केल्यावर होमपेज दिसेल. रजिस्टर बटणवर क्लिक केल्यास रजिस्टर अर्ज दिसेल. या अर्जात स्वत:ची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी भरावी.

- तीन हजार रुपये ऑनलाईन शुल्क भरल्यावर विद्यार्थी तसेच पालक या वेबसाईटचे सदस्य बनतील. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही या वेबसाईटवर लॉग इन करू शकतात.

- आपल्या पाल्याने या वेबसाईटवर कोणते विषय अभ्यासले, किती तास तो वेबसाईटवर काम करीत होता, त्याने कोणकोणत्या विषयाच्या परीक्षा दिल्या, त्यात त्याला किती गुण मिळाले याची माहिती पालक स्वत:चा लॉगइन आयडी वापरून पाहू शकतात.

- या वेबसाईटवरील परीक्षा देताना विद्यार्थ्याला कॉपी करता येणार नाही. उत्तर शोधण्यास वेळ घेतल्यास विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पूर्ण होणार नाही.

- राज्यातल्या शाळाही या वेबसाईटद्वारे

ई-लर्निंगचा तास सुरू करू शकतात. त्यासाठी शाळांना चार होमपेज देण्यात येतील. या पेजवरती शाळा त्यांचे वार्षिक वेळापत्रक, सुट्ट्या, परीक्षा आदी माहिती अपलोड करू शकतात.

- वेबसाईटवरील वेळापत्रक या कॉलममध्ये विद्यार्थ्यांना नवीन येणार्‍या परीक्षांविषयी माहिती मिळेल. शिवाय कोणत्या दिवशी नवीन धडा अथवा गणिताचे प्रकरण वेबसाईटवर दिसेल हेही आगाऊ सांगण्यात येईल.

उठावदार रंग, मोहक गाणी, गोष्टीरूपातील धडे यांमुळे ही वेबसाईट आकर्षक बनली आहे. एकेका गुणासाठी धडपडणार्‍या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट खासगी शिकवणीचेच काम करेल. शिवाय यावरील अभ्यासाचे स्वरूप शिक्षकांनीच तयार केले असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भर पाडेल.

- अच्युत गोडबोले, आयटीतज्ज्ञ
saujanya : samana 03052012 .

No comments: