Saturday, January 22, 2011

कधीतरी हे बोलायलाच हवं गरज ‘सायबर’ सुरक्षेची

कुमारवयीन मुला-मुलींना ही सोशल नेटवर्किंग साईटस्चे आकर्षण असते, पण बर्‍याचदा या साईटस्वर अनोळखी लोकांशी मैत्री केल्याने मोठा गोंधळ होऊ शकतो. अशा साईटवर किंवा चॅटवर ओळख झालेल्या व्यक्तीला कुमारवयीन मुली/मुले भेटायला जातात. हे अतिशय घातक ठरू शकते.



कॉम्प्युटर, इंटरनेटने आपल्याप्रमाणेच आपल्या कुमारवयीन पाल्यांच्या आयुष्याचाही ताबा घेतला आहे. या गोष्टीचा आपण बर्‍याचदा विचारच करीत नाही. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कॉम्प्युटर, इंटरनेटचा नक्कीच वापर होऊ शकतो, पण त्याबरोबर येणार्‍या ऑर्कुट, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटस्, चॅट, व्हिडीओ गेम्स इत्यादी शॉपिंगच्या व्यसनांपासून आपण आपल्या कुमारवयीन पाल्यांना वाचवायला हवे. त्यातच पॉर्नोग्राफिक साईटस्च्या जाळ्यात आपला पाल्य अडकतोय का? यावरही आपण लक्ष ठेवायला हवे.



आपण सर्वांप्रमाणेच कुमारवयीन मुला-मुलींना ही सोशल नेटवर्किंग साईटस्चे आकर्षण असते, पण बर्‍याचदा या साईटस्वर अनोळखी लोकांशी मैत्री केल्याने मोठा गोंधळ होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी ऑर्कुटवर मैत्री केलेल्या लोकांकडून नवी मुंबई-पाम बीच रोडवर एका कुमारवयीन मुलाची हत्या झाली होती. त्यामुळे आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर अनोळखी लोकांची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ न स्वीकारण्याचा सल्ला आपल्या कुमारवयीन पाल्याला द्या. बर्‍याचदा अशा साईटवर किंवा चॅटवर ओळख झालेल्या व्यक्तीला कुमारवयीन मुली/मुले भेटायला जातात. हे अतिशय घातक ठरू शकते. तसेच सोशल साईटस्वर डाऊनलोड केलेल्या फोटोंचा दुरुपयोग झाल्याची उदाहरणेही आहेत. त्यामुळे आपले वैयक्तिक फोटो सहसा आपल्या साईटस्वर डाऊनलोड करू नयेत.



बर्‍याचदा कुमारवयीन मुले एकमेकांचा ई-मेल वापरतात. कोणालाही आपल्या ई-मेलचा पासवर्ड सांगू नये. कुमारवयात एकमेकांना अशा वैयक्तिक गोष्टी सांगणे, एकमेकांवर किती विश्‍वास आहे हे वाखाणण्यासाठी केले जाते, पण कितीही जवळचा मित्र-मैत्रीण असेल तरी आपल्या ई-मेलचा पासवर्ड त्याला सांगू नये.



आपला कुमारवयीन पाल्य कुठल्या साईट्सच्या जाळ्यात तर अडकत नाही ना हे कळावे म्हणून तो पाहत असलेल्या साईटस्ची वेब हिस्ट्री तपासून पहा. तसेच अनावश्यक साईटस् आपल्या कॉम्प्युटरवर नको असल्यास त्याला सॉफ्टवेअर गार्डियन बसवून घ्या. तसेच आपल्या व आपल्या कुमारवयीन पाल्याच्या ई-मेलला स्पॅम फिल्टर बसवून घ्या. काही विशिष्ट की-वर्डस्चा वापर करून हे स्पॅम फिल्टर पॉर्नोग्राफिक साईटस्चे मेल आपल्या व आपल्या पाल्याच्या अकाऊंटवर येणे टाळू शकते. शक्य असेल तर आपले कॉम्प्युटर बंद खोलीत ठेवण्याऐवजी बैठकीतच ठेवा.



प्रश्‍न : आमची कुमारवयीन मुलगी सतत आमच्या कॉम्प्युटर रूममध्येच बसलेली असते. रात्री उशिरापर्यंत ती मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करीत असते. याचा परिणाम तिच्या अभ्यासावरही होऊ लागलाय. काय करावे?



उत्तर : सर्वप्रथम तुमचे कॉम्प्युटर बंद खोलीतून घरात सर्वांची ये-जा असेल अशा सार्वजनिक ठिकाणी हलवा. तुम्हाला तुमची मुलगी किती वेळ कॉम्प्युटरवर असेल याचे कडक नियम तिला समजावून सांगावे लागतील. ‘आधी अभ्यास मग कॉम्प्युटर’ हा नियम करा. तसेच ‘रात्री दहानंतर कॉम्प्युटर बंद’ हा नियम करा. यामुळे तिच्या दृष्टीवर विपरीत परिणाम होईल व तिचे वजन वाढेल हे तिला समजावून सांगा.



* आपल्या कुमारवयीन पाल्याला खालील गोष्टींची जाणीव करून द्या -



- बर्‍याच वेबसाईटस्वर नाव, घरचा पत्ता, ई-मेल, फोन नंबर अशा माहितीची मागणी केली जाते. ही माहिती देऊ नका.



- पालकांना विचारल्याशिवाय सहसा इंटरनेटवरून शैक्षणिक साहित्य वगळता काही डाऊनलोड करू नका.


- सोशल साईटस् किंवा चॅटवर अनोळखी लोकांशी बोलण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तींशी संवाद साधण्यावर जास्त भर द्या.



- डॉ. अमोल अन्नदाते
amolaannadate@yahoo.co.in

व्यसनविरोधी एटीएस



दहशतवाद्यांशी मुकाबला करणारं एटीएस अर्थात ‘ऍण्टी टेररिस्ट स्क्वॉड’ सर्वाच्या परिचित आहे पण तुम्हाला तरूणांचं ‘एटीएस’ माहित आहे का? या नव्या एटीएसने आपले जाळे संपूर्ण देशभर पसरवण्यास सुरूवात केली आहे एक एटीएस दहशतवाद्यांशी लढतं तर हे दुसरं एटीएस व्यसनाविरोधी लढतं तरुणांच्या या एटीएसचा फुलफॉर्म आहे ‘ऍण्टी टोबॅको स्क्वाड’! थर्टी फर्स्टच्या पार्टीत व्यसनाधीनांचा धुमाकूळ असताना ही व्यसनविरोधी मोहीम नक्कीच नववर्षाची पहाट घेऊन येईल.




बदलापूरला राहणार्‍या सचिन गायकवाड या २४ वर्षीय तरुणाने हे पथक स्थापन केले आहे समाजाला तंबाखूपासून मुक्त करणं हे या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहे या कामात सचिनला मदत करण्यासाठी मुंबईच्या कॉलेजची मुलं-मुलीही पुढे आली आहेत ही मुलं व्यसनमुक्ती अभियान राबवित आहेत या पथकाची नेमकी सुरूवात झाली कशी? याविषयी सचिन म्हणाला की, सांताक्रुझ येथे कामाला असताना मी तंबाखू आणि सिगारेटच्या आहारी गेलो होतो त्या ऑफिसमध्ये माझे काही सहकारी ड्रक्स घेणारे होते आपणही या वाटेवर भरकटत जाण्याची शक्यता असल्याची जाणीव मला झाली याचदरम्यान एकदा माझ्या आईला केईएम रुग्णालयात नेत असताना तिथे मला तंबाखूमुळे कॅन्सर झालेल्या रुग्णांचे भयानक पोस्टर्स पहायला मिळाले आणि ते पाहून मी हादरलोच त्या क्षणापासून मी तंबाखू खाणं सोडून दिलं आणि इतरांचेही व्यसन सोडवण्याचा निर्धार केला, असं सचिन सांगतो



कामाला जाताना बदलापूर-दादर प्रवास करताना सचिन आपल्या मित्रांना, त्या डब्यातील इतर प्रवाशांना तंबाखूमुळे होणार्‍या भयावह रोगाची पोस्टर्स दाखवू लागला त्याच्या कामाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला त्याची ओळख ट्रेनमध्ये ‘व्यसनमुक्तीवाला’ अशी होऊ लागली एका प्राध्यापकाने त्याला कॉलेजमध्ये याविषयी मुलांना मार्गदर्शन कर, असे सुचविले आणि तीच त्याच्या चळवळीसाठी मोठी शिडी ठरली बारावी नापास झालेला हा मुलगा एमबीए, लॉ विद्यार्थ्यांचाही शिक्षक झाला ‘तंबाखू आणि त्याचे परिणाम’ याविषयावर तो त्यांना धडे देऊ लागला यासाठी मुंबई विद्यापीठाने त्याला मुंबईतल्या कॉलेजमध्ये प्रबोधन करण्याची परवानगी दिली आहे एखाद्या गल्लीत सत्यनारायणाची पूजा असो किंवा एखादा घरगुती कार्यक्रम असो, सचिन त्याठिकाणी जाऊन तिथेही पोस्टर्स, सीडीद्वारे आपले म्हणणे पोहोचवतो तसेच महाराष्ट्र पोलिसांनाही तो याविषयी माहिती सांगतोे प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात अनेक भक्त आपलं गार्‍हाणं मांडण्यासाठी फेर्‍या घालत असतात. पण याच भक्तांच्या गर्दी समोर प्रबोधन करण्याची संधी मिळावी म्हणून परवानगीसाठी दीड वर्ष तो दररोज मंदिरासमोर फेर्‍या मारत होता शेवटी त्याला परवानगी मिळाली अंगारकी चतुर्थीला तो त्याठिकाणी प्रदर्शन भरवतो तंबाखू, दारू, सिगारेट यामुळे होणारे दुष्परिणाम पथनाट्य, प्रदर्शन आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो



नोकरी सोडल्यावर उदरनिर्वाहासाठी तो डोबिंवलीला रस्त्यावर उभं राहून सॅण्डविच विकत होता त्यातूनच आतापर्यंत पथकाच्या खर्चाचा डोलारा त्याने सांभाळला पण आता तोही स्टॉल त्याच्या हातून गेला माझ्या सहकार्‍यांना वडापाव देण्यासाठीसुद्धा माझ्याजवळ पैसे नसतात तसेच जे कोणी कार्यक्रमाला आम्हाला बोलावतात ते अनेकदा गाडीभाडंही आम्हाला देत नाहीत पण तरीही आमच्या कामात खंड पडत नाही, असे सचिन सांगतो या कामासाठी सचिनला आर्थिक पाठिंब्याची गरज आहे अशा परिस्थितीतही छबिलदास ज्युनियर कॉलेज, रुपारेल, बदलापूरचे भारत इत्यादी कॉलेजचे जयदीप शिंदे, सुदेश यादव, डेनियल, हर्षाली पोतदार, पराग काळसकर, श्रेया चव्हाण असे बरेच विद्यार्थी त्याच्यासोबत आहेत ही मुलं व्यसनग्रस्तांना यातून बाहेर काढण्यासाठी उपायही सुचवतात ३१ डिसेंबर या दिवशी अनेक जण पहिल्यांदा दारूची चव चाखतात म्हणून या दिवसालाच टार्गेट करण्यासाठी सचिन आपली टीम सज्ज ठेवतोे



कॉलेजला जाणारी अनेक तरूण मुलं कॉलेजबाहेर सिगारेट ओढताना दिसतात या सवयी घरच्यांपासून लपवल्या जातात मग अशावेळी या मुलांना स्वामी विवेकानंदांचे आईविषयीचे विचार सांगूून तो इमोशनल करतो आणि यातून तरुणांना व्यसनमुक्त करतो हे काम करताना त्याला अनेक तरुण ‘बिनपगारी फुल अधिकारी’ असे टोमणे मारतात तर सिगारेट ओढणार्‍या मुलींचा त्यांना केव्हा केव्हा मारही खावा लागतो पण त्याची तमा न बाळगता सचिन आपले काम करतच राहतो संपर्क : ९९२०२३६५८६.







गुटखा सोडवण्यासाठी ओवा, बडीशेप



गुटखा सोडण्याची इच्छा असणार्‍यांनी ओवा, बडीशेप, काळं मीठ एकत्र करून त्यावर लिंबाचा रस पिळावा हे मिश्रण एका स्टीलच्या डब्यात भरून गुटख्याची तलफ आल्यावर खा सात दिवसात तुमची गुटखा खाण्याची सवय मोडेल असा उपाय सचिन सुचवतो.







Friday, January 21, 2011

सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम

विवेकानंद केंद्राने सामूहिक सूर्यनमस्कार घालून नुकताच जागतिक विक्रम केला. काही शाळांमधूनही नियमित सूर्यनमस्कार घालण्याचे शिक्षण दिले जाते. सूर्याच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार घालण्यासारखा उत्कृष्ट व्यायाम नाही. त्याची सुरुवात करायला थंडीचा मुहूर्त उत्तम आहे.


आबालवृद्ध कोणीही स्त्री - पुरुषाने रोज किमान बारा तरी सूर्यनमस्कार घालावेत. शरीरातील सर्व नाड्या, मांसपेशी, स्नायू त्यामुळे पूर्णत: कार्यक्षम बनतात, रक्ताभिसरण सुधारते, पचनेंद्रिये, मज्जारज्जू यांचे कार्य/ आरोग्य सुधारते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरावर साठलेली अनावश्यक चरबी कमी होऊन शरीर सुडौल होण्यास सूर्यनमस्कार हा एक रामबाण उपाय ठरतो.

श्‍वसनाच्या लयबद्धतेमुळे फुप्फुसे आणि हृदय अधिक कार्यक्षम बनतात. सकाळी कोवळ्या सूर्यकिरणात ओंकार आणि बीजमंत्रासह सूर्यनमस्कार घातल्यास शारीरिक लाभासोबत आध्यात्मिक लाभसुद्धा मिळतात.

एक सूर्यनमस्कार पूर्ण झाल्यावरच प्रणवयुक्त बीजमंत्रासह सूर्याच्या नावाचा उच्चार करावा. सूर्य हा चराचर सृष्टीचा आत्मा आहे, असे ऋग्वेदात म्हटले आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सूर्याचे सामर्थ्य वर्णन करून सांगितले की सूर्याचे नामोच्चारण, दर्शन आणि सकाळच्या किरणात घातलेले सूर्यनमस्कार यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तींचा विकास होतो.

ॐ च्या उच्चारणाने हृदय आणि मेंदूला चालना मिळते. र्‍हीम् व र्‍हाम्च्या उच्चारणाने अपान वायू फेकला जाऊन श्‍वसनसंस्था अधिक कार्यक्षम बनते. र्‍हूंच्या उच्चारणाने पोट आणि ओटीपोटीतील अवयवांची कार्यक्षमता वाढते. र्‍हैम्च्या उच्चारणामुळे मूत्रसंस्था कार्यक्षम बनते. र्‍हौम्च्या उच्चारणाने मलाशयावर परिणाम होतो. र्‍ह:च्या उच्चारणाने कंट आणि छाती कार्यक्षम बनतात.

प्रणव आणि बीजमंत्रासह सूर्याची बारा नावे खालीलप्रमाणे -

१) ॐ र्‍हाम् मित्राय नम:

२) ॐ र्‍हीम् रवये नम:

३) ॐ र्‍हूम् सूर्याय नम:

४) ॐ र्‍हैम् भानवे नम:

५) ॐ र्‍हौम् खगाय नम:

६) ॐ र्‍ह: पुष्णे नम:

७) ॐ र्‍हाम् हिरण्यगर्भाय नम:

८) ॐ र्‍हीम् मरीचये नमऽ

९) ॐ र्‍हूम् आदित्याय नम:

१०) ॐ र्‍हैम् सवित्रे: नम:

११) ॐ र्‍हौम् अर्काय नम:

१२) ॐ र्‍ह: भास्कराय नम:


सूर्यनमस्कार ही विविध योगासनांनी गुंफलेली एक शृंखला आहे. त्यामधील प्रत्येक अवस्थेला विशिष्ट योगासनाचे नाव आहे.

स्थिती १ - शक्यतो पूर्व दिशेला तोंड करून दोन्ही पाय जोडून ताठ उभे राहावे. दोन्ही हात छातीच्या मध्यावर जोडून नमस्कार करावा. (नमस्कारासन)


स्थिती २ - जोडलेले हात श्‍वास घेत असताना डोक्याच्या वर घ्यावेत. पाठीचा कणा मागच्या दिशेला झुकवावा. (ऊर्ध्व नमस्कारासन)


स्थिती ३ - श्‍वास सोडत असताना पुढे वाकून तळहात पायाच्या बाहेरच्या बाजूला जमिनीवर ठेवावेत. पण गुडघे वाकवू नयेत. (पाद हस्तासन)


स्थिती ४ - श्‍वास घेत उजवा पाय मागे नेऊन चवडा व गुडघा जमिनीवर ठेवावा, मान झुकवून वर पाहावे. (अर्ध भुजंगासन)


स्थिती ५ - श्‍वास सोडत डावा पाय मागे घेऊन उजव्या पायाप्रमाणे ठेवावा, छाती व कपाळ जमिनीला टेकवावे. (अष्टांगासन)


स्थिती ६ - श्‍वास घेत डोके व छाती वर उचलून वर पाहावे. (भुजंगासन)


स्थिती ७ - श्‍वास सोडताना हात व पायाचे तळवे जमिनीवर ठेवून कंबर वर उचलावी. डोके जमिनीकडे ठेवावे. (अधोमुख श्‍वानासन)


स्थिती ८ - श्‍वास घेत डावा पाय पुढे आणून पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये ठेवावे. (अर्धभुजंगासन)


स्थिती ९ - श्‍वास सोडत उजवा पाय पुढे आणून डाव्या पायासोबत ठेवावा, पुन्हा ओणवे व्हावे. (पादहस्तासन)


स्थिती १० - श्‍वास घेत उभे राहत स्थिती २ मध्ये यावे. (ऊर्ध्व नमस्कारासन)

स्थिती ११ - हात खाली आणताना श्‍वास सोडत पूर्वस्थितीमध्ये यावे. (नमस्कारासन)

अशा रीतीने ताण, बाक एकामागोमाग देऊन शरीर (विशेषकरून पाठीचा कणा) लवचिक ठेवण्यासाठी सूर्यनमस्काराला तोड नाही.

- मनोज सूर्यकांत वराडे