नेहमी काहीतरी नवं हवं असतं… तोच त्यांचा वेगळेपणा असतो. आता दिवाळीचंच
घ्या… कुठेही गेलं तरी फराळच समोर येतो. फराळातील तेच ते नेहमीचे पदार्थ
किंवा तोच तो नेहमीचा ब्रेकफास्ट खाऊन कंटाळा येणं स्वाभाविकच… यातच
काहीतरी वेगळं, समथिंग न्यू करता आलं तर… पण हे न्यू म्हणजे नेमकं काय तर
काहीतरी वेगळी डिश ट्राय करायची.. वेगळा चविष्ट पदार्थ खायला सर्वांनाच
आवडेल… या वेगळ्या डिश जाणून घ्यायच्या तर दुसर्या राज्यांमधल्या
ब्रेकफास्ट स्पेशॅलिटी माहीत करून घ्यायला हव्यात. त्यामुळे होईल काय, नवीन
पदार्थही खायला मिळेल आणि नेहमीच्या टेस्टपेक्षा बेस्ट अनुभवायला मिळेल.
आंध्र प्रदेशचा ‘पेसारट्टू’ हा पदार्थ एकदम प्रसिद्ध… थोडक्यात आपल्याकडे
डोसा मिळतो ना, त्यासारखाच… पण तो तिकडे मुगाच्या डाळीपासून बनवतात.
भिजवलेल्या मुगाची डाळ आणि तांदूळ घेऊन त्यात बटर, कांदा, हिरवी मिरची, आलं
यांचं वाटण घालायचं. या सगळ्या मिश्रणाचा डोसा बनवायचा. मस्तपैकी ओल्या
खोबर्याच्या चटणीबरोबर तो गरम गरम खाल्ला तर ‘वा, क्या बात हैं’. घरात
बसून आंध्रचा पेसारट्टू खाल्ल्याचे समाधान नक्कीच मिळेल.
कांदे-पोहे, बटाटा-पोहे, साबुदाणा खिचडी हे पदार्थ महाराष्ट्रीयनांच्या
नाश्त्यात असतातच, पण हल्ली वेळ वाचवायचा म्हणून झटपट पदार्थ करण्याकडे कल
असतो. त्यातलाच एक म्हणजे ब्रेड-उपमा. काय करायचं माहितीय? ब्रेडच्या
स्लाईसचे छोटे तुकडे करायचे. कढईत मोहरी, हिंग, हळद, कढीपत्त्याची फोडणी
द्यायची. वरून हिरवी मिरची, चवीपुरते मीठ, कांदा घालायचा. ब्रेडचे तुकडे
घालून चिमूटभर साखर घालायची. त्यावर झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मंद आचेवर
ठेवावी. वरून लिंबाचा रस, कोथिंबीर घातली की, गरमागरम ब्रेड-उपमा तयार…
केरळचा ‘पुट्टू’ घरी बनवायचा असेल तर अगदी सोपा आहे. तांदळाच्या पिठापासून
हा पदार्थ बनवला जातो. तांदळाचे पीठ गरम पाण्यात मळायचे. पुट्टू
बनवण्यासाठी पुट्टू मेकर असेल तर उत्तम. त्यात चमचाभर खोबर्याचा कीस,
त्यावर तांदळाचं पीठ घालायचं. पुन्हा त्यावर खोबर्याचा कीस घालायचा. तो
गोल पूर्ण भरल्यावर वरून झाकण लावायचे. शिजल्यानंतर रोल करून कोणत्याही
कडधान्याच्या रश्श्यासोबत खायचा… लय भारी!
कश्मीरचा ‘स्वीट पनीर पराठा’ हा पदार्थही प्रसिद्ध आहे. गव्हाच्या पिठाची
चपाती लाटून त्यावर साखर पसरवावी आणि तो गोळा पुन्हा मळून लाटायचा. किसलेले
पनीर, साखर, ड्रायफ्रुट्स, सुक्या खोबर्याचे तुकडे एकजीव करून लाटायचे
आणि भाजून घ्यायचे. हा पदार्थ बनवायला एकदम सोपा आणि झटपट तयार होतो.
चहासोबत खाल्ला तर त्याची टेस्ट काही औरच!
गोव्यात नाश्त्यात ‘टोनक-पाव’ नावाचा पदार्थ खातात. हे टोनक-पाव म्हणजे
आपली पाव-भाजीच. कढईत बटाटा, कांदा, चिंच, खोबरे, गरम मसाला भाजून घ्यायचे.
नंतर तेल टाकून उभा चिरलेला कांदा परतवून घ्यायचा. त्यामध्ये किसलेले
खोबरे लाल होईपर्यंत परतायचे. नंतर मसाला व खोबरे मिक्सरला लावून घ्यायचे.
कढईत तेल टाकून बारीक चिरलेला कांदा टाकायचा. त्यात उकडलेले कडधान्य,
उकडलेला बटाटा टाकायचा आणि शेवटी वाटण घालायचे. एक उकळी आली की, टोनक तयार…
बिहारमध्ये ‘सत्तू पराठा’ म्हणून प्रसिद्ध आहे. गहू आणि चण्याच्या
पिठापासून तयार केलेल्या सत्तूच्या पिठात बारीक कांदा, कोथिंबीर, हिरवी
मिरची आणि मसाले घालायचे. त्यात थोडं मीठ आणि पाणी घालून पीठ मळायचं. नंतर
त्यात कणकेचा गोळा मिसळून तो खोलगट करायचा. त्यात सत्तूचे सारण भरून पराठा
लाटून घ्यायचा. तो तव्यावर दोन्ही बाजूंनी खमंग भाजून त्यावर तूप लावायचे.
पश्चिम बंगालमध्ये ब्रेकफास्टमध्ये ‘राधाबल्लवी’ हा पदार्थ खातात. हा
पदार्थ घरच्या घरी चाखायचा असेल तर उडदाच्या डाळीमध्ये वेगवेगळे मसाले
घालून पुरी बनवायची. नेहमीच्या छोट्या पुर्यांपेक्षा आकाराने थोड्या
मोठ्या पुर्या बनवायच्या. या पुर्या अगदी सॉफ्ट आणि मस्त लागतात. ही पुरी
भाजीसोबत किंवा रश्श्यासोबत खायला एकदम टेस्टी.
सौजन्य :- फुलोरा, सामना २०१११५