दही रोज खाऊ नका, पण रोज ताजं ताक प्यायलात तर चालेल हे घरातल्या मोठ्यांना बोलताना ऐकलं असावं. दही नको, पण दह्यापासून तयार होणारं ताक चालतं, हा विचारात टाकणारा प्रश्न, पण तो अगदी बरोबर आहे.
दही मुळात उष्ण, चिकट पचायला जड आणि रक्त खराब करण्यास अग्रेसर म्हणून ज्यांना ऍलर्जीमुळे सर्दी होते त्यांच्यामध्ये खूप दही खाण्याचा इतिहास दिसतो. ताक हा मुळात मंथनातून तयार होणारा भाग आहे. शास्त्रामध्ये सांगताना ताक हलके, किंचित तुरट व आंबट वातनाशक, कफघ्न व अग्नी वाढवणारा असून सूज, मूळव्याध, मूत्ररोग, दाह, बालरोग, अरुची, प्लीहावृद्धी, पांडू गुल्म व विषजन्य विकार यांचा नाश करतो. तापामध्ये मंदावलेली भूक, जिभेची चव आणि उत्साह परत आणण्यासाठी ताकात तयार केलेला मऊ पातळसर भात हा घरगुती उपाय खूपच फायदेशीर आहे. उष्णतेमुळे शरीराचे कमी झालेलं पाण्याचे प्रमाण आणि शारीरिक थकवा दूर करणारं ताक हे सर्वोत्तम पेय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुर्वेदात मानसिक कारणामुळे होणार्या सोरयासिससारख्या त्वचा विकारात (आमलकी+मुस्ता) यात तयार केलेल्या ताकाच्या शिरोधारेचे उत्तम काम आहे हा अद्भुत योग आहे. धणे-जिरे पावडर व हिंग टाकून तयार केलेले ताक अन्न पचनास फायदेशीर असून पोटात गॅस जमा होऊ देत नाही.
आता तुम्ही ठरवा, शरीरात तुफान निर्माण करणारी थंड पेये घ्यावीत की घरच्या घरी उपलब्ध होणारं आणि मंथनातून तयार होणारं ताक घ्यायचं.
- वय वर्षे २६, अनियमित मासिक पाळी आणि अतिप्रमाणात रक्तस्राव असतो. उपाय सांगा. (आशा कुलकर्णी) ठाणे
- आपणास नाडी परीक्षण करून औषध घेण्याची आवश्यकता आहे. आपणास वैद्यकीय सल्ल्यानुसार शरीरशुद्धी औषधी योजना आणि आहार नियोजन करणे आवश्यक आहे. मासिक पाळीची पथ्य पाळून औषधी घेतल्यास हा त्रास लवकर बरा होतो.
सौजन्य :- फुलोरा, सामना ०६०६१५ दीपक केसरकर
No comments:
Post a Comment