येस सर...मिचमिच्या डोळ्याची चायनीज वाटणारी मुलगी दरवाजा उघडताच आदराने, पण इंग्रजी स्वागत करते... आणि मग वेटरपासून मॅनेजरपर्यंत दिसतात ते सगळेच ‘चायनीज’... इथं खरं चायनीज मिळणार हे पहिल्या फटक्यात उमजून जातं. मग ‘वोक हाय’मधला पुढचा टप्पा सुरू होतो.
सुरुवातीलाच ‘स्पेशल मंगोलियन सूप’... हळदीच्या रंगाचं. गाडीवर असा रंगही कधी दिसत नाही. त्यामुळे मनात संशय...‘नो सर’ लगेच खुलासा. ‘आम्ही रंग वापरत नाही. कुठलाही अनहायजेनिक किंवा केमिकल पदार्थ आमच्याकडे वापरला जात नाही. ना सॉसमध्ये ना सूपमध्ये. थेट कंपनीकडून घेतलेल्या ‘सॉस’बद्दल मी बोलणारच नाही, कारण ‘फूड ऍण्ड ड्रग’कडून मंजूर असलेले पदार्थच आम्ही वापरतो,’ हरी कोटीयन यांनी लगेच सांगून टाकले. संशय फिटला.
अन् मग खाताखाताच कोटीयन कुटुुंबाचा रुईयासमोरील ‘डीपी’ज... किंवा दुर्गा परमेश्वरीपासून ते अगदी आजच्या ‘वोक हाय’पर्यंतचा इतिहास हरी कोटीयन आणि त्यांचे मोठे बंधू प्रसाद कोटीयन यांनी सांगून टाकला. वयाच्या १६/१७ वर्षांपासून या दोघांनी कष्टाला सुरुवात केली. आज मुंबईत डीपीसह त्यांची ४ हॉटेले आहेत. चायनीज आणि थाई जेवणात त्यांचा हातखंडा आहे. मेहनतीचे आणि अभ्यासाचे फळ आहे. तिसरा भाऊ विनायक कोटीयनही आता गप्पात सहभागी झाला...
‘बिग बझार’ लोअर परळच्या समोरच आता त्यांनी ‘वोक हाय’ची शाखा सुरू केलीय. गंमत म्हणजे पहिल्या दिवसापासून ‘तरुणाई’ने इथले थाई फुड फुल एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. गप्पा मारता मारता सूप संपलं होतं आणि पुढ्यात खास ‘फ्रूट बीअर’ आली होती. दहावी-बारावीतली तरुणाई परवाच पार्टी करून गेली ‘फ्रूट बीअर’ची. त्यांची त्यांच्यापुरती एन्जॉयमेंट - नो अल्कोहोल फक्त फळांचा रस, पण दिसणं आणि फेसाळणं बीअरसारखंच मुलांना काय, करतात मजा.
‘वोक हाय’चा मेन मेनू म्हणाल तर बांबू राईस आणि ‘थाय किंवा बर्मीज’ करी. या करीजसाठी वापरलं जाणारा नारळाचं दूध खास थायलंडवरून आणलं जातं. त्यामुळे जाडसर ग्रेव्हीच्या या ‘करी’ज फार वेगळ्या असतात...पण त्यात चमचमीतपणा कमी असतो. ज्याला तिखटच हवं त्याने ते सांगायचं.
सुरुवातीला सूपमध्ये मंगोलियन सूपप्रमाणेच तिबेटी सूप ‘भूलुंग’ हा प्रकारदेखील ट्राय करायला हरकत नाही. ‘चिकन मोमोज’ हे स्टार्टर भन्नाटच स्टार्टर्सनंतर मेन कोर्स. नुडल्समध्ये ‘मलेशिअन फ्लॅट नुडल्स’ हा वेगळाच आणि जरासा तिखट प्रकार त्याच्या जोडीला ‘प्रॉंझ करी’ मुद्दाम मागवायची मजा येते. इथं उकडा तांदूळ नाही, कलर्स नाही आणि ‘अजिनोमोटो’ खवय्यास हवं तरच वापरलं जातं. त्यामुळे आधी खवय्याच्या आरोग्याची काळजी इथं घेतली जाते. चायनीज किंवा थाई पदार्थात स्पेशल फिश डिशही भारीच. रावस किंवा पापलेट थाई स्टाईल इथलं प्रसिद्ध आहे. ‘प्रॉन्स राईस तर मस्तच.
याखेरीज येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोअर परिसरातील कॉर्पोरेट दुनियेला खूश करणारी त्यांची ‘पार्सल’ पद्धती. ऑफिसेसला लागणारी पार्सल देताना आता खास ऑफिस पॅक, फॅमिली पॅक आणि पार्टी पॅक असा प्रकार त्यांना पुढे आणला आहे. ही खरं तर हैदराबाद बिर्यानी स्टाईल आहे. तिथं १० जणांचं बिर्यानी पॅक दिलं जातं. त्याचप्रमाणे एखाद्या ऑफिसला १२ जणांचं जेवण हवं तर तसा पॅक; कुणाच्या फॅमिलीत सहाजणांना तर तसं फॅमिली पॅक. पार्टी असेल तर तसं पार्टी पॅक. याखेरीज कूपन सिस्टीमही आहेच. त्यामुळे कार्पोरेट लाईफसाठी फंडा एकदम झकास. चवीलाही आणि वेळेलाही. शेवटचा प्रॉन्झ तोंडात टाकताना चवीचं पटलंही आणि वेळेचं म्हणाल तर ज्याच्या त्याचा अनुभव.
सौजन्य :- सामना ०६०६१५