Monday, August 06, 2012

‘व्हायरस’ना शह

आजच्या सायबर युगात सायबर विश्‍वाची मुशाफिरी करताना आपल्या संगणकावर किंवा इतर कोणत्याही डिजिटल उपकरणामध्ये गरजेची व सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऍण्टिव्हायरस. बर्‍याच वेळा आपल्या संगणकावर अनेक चांगले सॉफ्टवेअर इन्स्टॉल असतात. परंतु चांगले ऍण्टिव्हायरस इन्स्टॉल करण्याकडे आपल्याकडून दुर्लक्ष होते. आजकाल बर्‍याच संगणकनिर्मिती करणार्‍या कंपन्या सुरुवातीचे काही दिवस मोफत ऍण्टिव्हायरस सॉफ्टवेअर देतात. असे ऍण्टिव्हायरस सॉफ्टवेअर त्याच्या ठरावीक कालावधीनंतर ‘रिन्यू’ करणे गरजेचे असते. परंतु ऍण्टिव्हायरसचा नक्की फायदा काय होतो हे बर्‍याचदा माहिती नसल्यामुळे ते रिन्यूअल केले जात नाही.
आजच्या सायबर विश्‍वात जेव्हा कोणताही संगणक इंटरनेटशी जोडला जातो तेव्हा तो जगातील कोट्यवधी संगणकांच्या नेटवर्कमध्ये असतो. अशावेळेस जर तुमच्या संगणकात योग्य ऍण्टिव्हायरस नसेल तर बाहेरच्या नेटवर्कमधील इतर संगणकातून येणारे व्हायरस, ट्रोजन, ऍडवेअर मालवेयर, स्पॅम, फिशिंग मेसेजस सहजपणे तुमच्या संगणकास टार्गेट करू शकतात व त्यामुळे तुमचा संगणक क्रॅश तर होऊ शकतोच व त्याचबरोबर तुमची वैयक्तिक माहिती जसे तुमचे ईमेल ऍड्रेस, त्याचा पासवर्ड किंवा तुमच्या संगणकातून तुम्ही जर इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल तर त्यातील गोपनीय माहिती सहजपणे कोणीही हॅक करू शकतात. त्यामुळे इंटरनेटला जोडल्या गेलेल्या कोणत्याही संगणकामध्ये ऍण्टिव्हायरस व तेही लायसन्स ऍण्टिव्हायरस असणे अतिशय गरजेचे आहे. आजकाल लायसन्स ऍण्टिव्हायरसची किंमतदेखील बर्‍यापैकी कमी झालेली आहे व साधारणत: ५०० ते १००० रुपयांमध्ये चांगले ऍण्टिव्हायरस सॉफ्टवेअर मिळू शकते. मॅकफी, नॉरटन, क्वीक हेल, के ७ व इतर अनेक चांगले ऍण्टिव्हायरस सध्या बाजारात उपलब्ध आहेत. संगणकाबरोबरच आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट पीसी व लॅपटॉपवरदेखील ऍण्टिव्हायरस असणे गरजेचे आहे.

ऍण्टिव्हायरसचे फायदे
- व्हायरस स्कॅनिंग : ऍण्टिव्हायरस सॉफ्टवेअर ठरावीक दिवसानंतर ऍटोमॅटिकली आपल्या संगणकातील व्हायरस स्कॅनिंग करतात व जर कोणताही व्हायरस आपल्या संगणकात आढळला तर तो डिलीट करतात.
- ऑटो अपडेट : सायबर विश्‍वातील ‘झीरो डे’ ऍटॅक टाळण्यासाठी ऍण्टिव्हायरस कंपन्या दररोज नवनवीन अपडेट करीत राहतात व जेव्हा जेव्हा आपण आपल्या संगणकावरील इंटरनेट चालू करतो तेव्हा प्रथम ऍण्टिव्हायरस सॉफ्टवेअर स्वत:ला अपडेट करते व ‘झीरो डे ऍटॅक’पासून आपले संगणक सुरक्षित राहाते.
- फायरवॉल : बहुतांशी ऍण्टिव्हायरसमध्ये फायरवॉल असते जी बाहेरील सायबर विश्‍वातील घातक व्हायरसेसपासून तुमच्या संगणकातील महत्त्वाच्या सॉफ्टवेअरचे रक्षण करते.
- ऍण्टिस्पॅम/ऍण्टिफिशिंग व ऍडवेयर कंट्रोल : ऍण्टिवायरस सायबर विश्‍वातून येणार्‍या स्पॅम, फिशिंग तसेच ऍडवेअरपासून तुमच्या संगणकाचे रक्षण करतो.

- रुटकीट/स्पाय/ट्रोजन : आपल्या संगणकातील गोपनीय माहिती चोरण्यासाठी रुटकीट/स्पाय किंवा ट्रोजनचा वापर केला जातो. परंतु ऍण्टिव्हायरस आपल्या संगणकाचे यापासून संरक्षण करतो.

सौजन्य - अमित घोडेकर, फुलोरा, सामना  040812

No comments: