प्राथमिक शिक्षण शिरढोणला झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी प्रथम त्यांनी कल्याण व नंतर मुंबई गाठली. ब्रिटिश सरकारचे प्रशस्तिपत्रक नको म्हणून त्यांनी फायनल परीक्षेपासून दूर राहणे पसंत केले. नंतर एक-दोन नोकर्या सोडून लष्कराच्या हिशेब खात्यात नोकरीस लागले. यावेळी त्यांची मुंबईहून पुण्यास बदली झाली. पुणे येथे नोकरी करीत असताना त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, घोड्यावर बसणे यांचे शिक्षण घेतले. शिरढोणला असलेली त्यांची आई अत्यवस्थ असल्याचे त्यांना कळले. पण ब्रिटिश अधिकार्याने त्यांची रजा नामंजूर केल्याने त्यांना आईच्या अंत्यदर्शनापासून मुकावे लागले आणि इथेच वासुदेवांच्या मनात ब्रिटिशांविरुद्धची पहिली ठिणगी पडली. 1876 ते 78 या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात सापडलेल्यांना ब्रिटिश सरकार मदत करीत नाही हे पाहून वासुदेवांच्या मनातील ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले.
वासुदेव बळवंत फडक्यांनी क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत असलेल्या शिवाजी महाराजांना स्मरून ब्रिटिश सरकार उलथून पाडण्याची व भारतभूमीला ब्रिटिशांपासून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यांनी बुरुड, रामोशी समाजातील तरुणांना एकत्र आणून एक सेना उभारली. आपल्या सैन्याच्या खर्चाकरिता व शस्त्रास्त्रांकरिता त्यांनी गावातील धनिकांना लुटले, पण देश स्वतंत्र होताच त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासनही दिले. त्यांनी ब्रिटिशांचा खजिना व ठाणी लुटली. इ.स. 1879 मध्ये त्यांच्या बंडांनी पुणे व रायगड जिल्ह्यांत ब्रिटिशांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले! त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने 5000 रुपयांचे इनामही लावले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अखेर फितुरी व आजारपण यांनी जेरीस आलेले वासुदेवराव पठाणांचे पगारी सैन्य उभारण्याकरिता विजापुरास निघाले. पण देवरनावडगी या ठिकाणी अखेर ब्रिटिशांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर खटल्याचा फार्स करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांची रवानगी एडनला करण्यात आली. निकस अन्न, आत्यंतिक कष्टाची कामे, खराब हवा व क्षयरोग यांनी वासुदेवराव पोखरून गेले. तरीही अशा परिस्थितीत त्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आजारपण व अन्नत्यागामुळे 17 फेब्रुवारी 1883 रोजी हा भारतमातेचा तेजस्वी सुपुत्र, दत्तात्रयांचा निस्सीम भक्त आणि शिवाजी महाराजांचा सेवक अनंतात विलीन झाला! 17 फेब्रुवारी रोजी येणार्या त्यांच्या पुण्यदिनी, भारतमातेच्या या सुपुत्राला आद्यक्रांतिवीराला मानाचा मुजरा!
पनवेलपासून पळस्पा फाट्याच्या पुढे तीन-चार कि.मी.वर मुंबई-गोवा महामार्गावर ‘शिरढोण’ हे आद्यक्रांतिकारी वासुदेव बळवंत फडक्यांचे जन्मगाव आहे. गावात वासुदेवरावांचा जन्म झाला तो वाडा आज दयनीय अवस्थेत उभा आहे. वासुदेवरावांच्या वाड्यासमोर कै. विष्णू गोपाळ तथा बापूसाहेब फाटक यांच्या पुढाकारांनी उभारलेले एक स्मृतिमंदिर आहे. या स्मृतिमंदिरात वासुदेवरावांचे फोटो, माहिती, पुतळे आणि ते लहानपणी वापरत असलेली बोकडाची गाडी ठेवण्यात आली आहे. 17 फेब्रुवारीला स्मृतिमंदिरात वासुदेवरावांच्या पुण्यदिनाचा कार्यक्रम होणार आहे. अधिक माहितीसाठी शिरढोण येथील क्रांतिवीरांचे चरित्र अभ्यासक माधव जोग-9323025167 यांच्याशी संपर्क साधावा. कर्नाळा किल्ल्याच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या आणि मुंबईजवळ असलेल्या शिरढोण येथील वासुदेवरावांच्या जन्मभूमीस आणि वाड्यास आवर्जून भेट द्या. ज्या क्रांतिवीरांच्या प्रेतांच्या पायघड्यांवरून स्वातंत्र्यलक्ष्मी चालत आली त्या सशस्त्र क्रांतींचे प्रवर्तक आद्यक्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर नतमस्तक सारेजण होतात.
अस्तित्वाला या देशाच्या जाग आणली खरी ।
म्हणोनी तुजला संबोधन हे आद्यक्रांतिकारी ॥
सौजन्य :- संदीप शशिकांत विचारे
No comments:
Post a Comment