Showing posts with label काही गडकिल्ले. Show all posts
Showing posts with label काही गडकिल्ले. Show all posts

Saturday, February 27, 2016

कल्याणगड

धुमाळवाडी गावातून गड चढताना डावीकडे पाण्याचे एक खांबटाके आहे. गावातून तासाभरात आपण गडाच्या भक्कम दरवाजात येऊन पोहोचतो. गडाच्या दरवाज्यापर्यंत येणारा रस्तासुद्धा आपल्याला इथेच येऊन मिळतो. गडाच्या दरवाजाला सध्या गडावर मुक्कामास असलेल्या साधुबाबांनी लोखंडी गेट बसवले आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला खालच्या बाजूला उतरत गेलेल्या पायर्‍या दिसताच. कल्याणगड किल्ल्यावर हे भुयारवंजा मंदिर असून सुमारे शंभर फुट आत गेल्यावर समोर दत्तात्रेय,पार्श्‍वनाथ व पद्मावती देवीची मूर्ती आहे. हे भुयारी मंदिर हेच कल्याणगड किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. पूर्वी ह्या भुयारात गुडघाभर पाण्यातून जावं लागत असे पण आता भुयारातील पाणी उपसून काढण्यात आले आहे. भुयार बघून बाहेर आल्यावर पुढे आपण बालेकिल्ल्याच्या भक्कम दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. समोरच मारुतीचे मंदिर आहे. बालेकिल्ल्यावर पाण्याची टाकी,वाडयाचे अवशेष,कोरीव दगड,चुन्याचा घाणा,सदरेचे अवशेष,एक पीर,भग्न तटबंदी,धान्यकोठार व एक तलाव असून समर्थ रामदासांचे शिष्य असलेल्या कल्याणस्वामींची समाधी आहे. त्यांच्या नावावरूनच गड कल्याणगड नावाने ओळखला जातो. गडावर प्रचंड मोठा नांदुरकी नावाचा वृक्ष असून तो सातारा परिसरातून कुठूनही सहज नजरेस पडतो. ह्या नांदुरकीच्या झाडामुळेच कल्याणगडाला नांदगिरी असेही एक नाव आहे. गडमाथ्यावरून चंदन-वंदन किल्ले,जरंडेश्‍वर,अजिंक्यतारा किल्ला, वर्धनगड व सातारा शहराचं अतिशय सुंदर दृश्य दिसतं. कल्याणगडावर आता गाडी जात असल्याने तसेच भरपूर अवशेष व विस्मयकारक असे जलमंदिर अतिशय प्रेक्षणीय असल्याने एका दिवसात नांदगिरी ऊर्फ कल्याणगडाचा हा ट्रेक धम्माल आणतो.
विशेष सूचना
– भुयाराच्या आत जाताना त्याच्या कड्यावर मधमाशांची पोळी असल्याने अजिबात गोंधळ करू नये तसेच कोणत्याही प्रकारचा धूर करू नये.
– कल्याणगड किल्ल्याला जोडून जवळपास बघण्यासारखी भरपूर ठिकाणे असून त्यात सातार्‍याचा अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, जरंडेश्‍वर डोंगर, पाटेश्‍वर, यवतेश्‍वर, वर्धनगड- महिमानगड, लिंब खिंड गावाजवळच्या शेरी गावातील बारा मोटेची विहीर ही अतिशय प्रेक्षणीय व चुकवू नये अशी ठिकाणे आहेत.
जायचं कसं
पुणे-बंगलोर महामार्गावर सातारा रोड गावाकडे जाणारा फाटा आहे. तिथून पुढे सुमारे वीस किलोमीटर्सवर असलेले सातारा रोड स्टेशन गाठावे. सातारा रोड स्टेशन वरून किन्हई गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर धुमाळवाडी गाव आहे. तिथून तासाभरात किल्ल्यावर जाता येते. तसेच किल्ल्याच्या शेजारच्या डोंगरावर सध्या पवनचक्क्या झाल्याने गडाच्या दरवाजापर्यंत मोठा लाल मातीचा रस्ता तयार करण्यात आला आहे ज्यामुळे आता चारचाकी वाहनाने सुद्धा गडाच्या वरपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.
जेवणाची सोय : गडावर जाताना जेवण सोबत घेऊन जावे किंवा पुणे- बंगलोर महामार्गावर जेवणासाठी हॉटेल्स आहेत तसेच कल्याणगडाच्या पायथ्यालाही जेवणासाठी हॉटेल आहे.
पाण्याची सोय : गडावर पाणी उपलब्ध आहे.
ओंकार ओक
सौजन्य :- फुलोरा, सामना २६०२१६

Saturday, January 04, 2014

ढोकेश्‍वर

आपला महाराष्ट्र देश हा अनेक गडकिल्ले आणि असंख्य गिरीशिल्पांनी नटलेला भूप्रदेश आहे. ह्या भूप्रदेशात अनेक गिरीशिल्पे खोदली गेली. अशाच एका अनवट डोंगरामध्ये काही गिरीशिल्पे पूर्वीच्या राजमार्गावर म्हणजेच पैठण ते नाणेघाट या मार्गावर टाकळी या गावी खोदली गेली. तीच लेणी आज ‘टाकळी-ढोकेश्वर’ या नावाने आजूबाजूच्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत.
आळेफाटा येथून नगर रस्त्यावर जाऊ लागले की तेथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ही सुंदर लेणी खोदली गेली आहेत. जमिनीच्या सपाटीपासून अवघ्या २०० मीटर उंचीवर कोरलेली ही सुंदर गिरीशिल्पे आजही भटक्यांना खुणावत आहेत. पुण्यापासून अवघ्या ११० कि.मी. अंतरावर आणि मुंबईपासून २०४ कि.मी. अंतरावर ही सुंदर लेणी आहेत. 
डोंगरपायथ्यापासून सुमारे ३०० पायर्‍या चढल्यानंतर आपल्या स्वागताला या लेण्या उभ्या असतात. यामध्ये आपल्याला एक मुख्य लेणे देखील पाहायला मिळते ते लेणे ‘ढोकेश्वराचे’ लेणे म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते. ढोकेश्वराचे लेणे हे पूर्वाभिमुख असून आतील गर्भगृहाला पूर्वेकडून व उत्तरेकडून दोन सुंदर दरवाजे खोदलेले आपल्याला पाहवयास मिळतात. हे लेणे म्हणजे चार खांबांचे खोदीव दालनच आहे. या मुख्य लेण्यांमध्ये पूर्वेच्या आणि उत्तरेच्या दोन्ही दारांमध्ये नंदी बघायला मिळतात. गाभार्‍याच्या बाहेर भव्य अशा गंगायमुनेच्या देखील मूर्ती बघायला मिळतात. तसेच या मूर्तींच्या जवळ एक सूर्यदेवतेची मूर्तीदेखील बघायला मिळते. 
या मुख्य लेण्याच्या गाभार्‍याच्या उजव्या कोपर्‍यात तांडवनृत्य करणारी शिवाची मूर्ती तसेच अष्टमातृकादेखील सुंदर रीतीने कोरलेल्या बघायला मिळतात. तसेच लेणीच्या मुख्य दारात जय-विजय द्वारपाल आणि बाजूला असणारे इतर देवी-देवता यादेखील आपले लक्ष वेधून घेतात. या मुख्य लेण्याच्या माथ्यावर डाव्या बाजूस सुमारे ७ ते १० मीटर उंचीवर चार दालनांची सुंदर गुहा आहे त्याला आजूबाजूचे लोक न्हावीघर असे संबोधतात. 
या गुहेमध्ये १र्६े१६ मीटरचे कातळात खोदलेले एक सुंदर टाके आपले लक्ष वेधून घेते. तसेच एक शिलालेखदेखील आपल्याला पायर्‍यांच्या जवळ पाहवयास मिळतो. अपरिचित असणारे हे सुंदर लेणे आवर्जून भेट देण्याजोगे आहे.

- अनुराग वैद्य
सौजन्य :- फुलोरा, सामना ०४०११४

Sunday, December 29, 2013

झुंजार रामशेज

 संभाजीराजेंचा इतिहास वाचत असताना किल्ले रामशेजचा उल्लेख आला. शंभूराजांच्या कारकीर्दीत या दुर्गने मोगलांना अशी काही झुंज दिली की, जवळपास साडेपाच वर्षे हा किल्ला मोगलांना जिंकताच आला नाही. मोगलांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली. विशेष म्हणजे ज्या किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली हा गड लढला त्या किल्लेदाराचे नाव मात्र इतिहासाला ठाऊक नाही. या अज्ञात शूरवीराच्या जोरावर हा किल्ला अजिंक्यच राहिला. सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा रामशेजचा इतिहास जसा साहित्यात शब्दांनी उतरवला गेला तसाच तो आमच्यासारख्या दुर्गभक्तांनी कपाळाला लावला तर त्यात ‘नवल’ ते काय!
आम्ही नेहमीच तिथे जात असतो तिथला इतिहास, भूगोल आणि धार्मिकतेचा संदर्भ हे विचारतच फिरत असतो. त्यामुळे आमच्या ज्ञानात नेहमीच भर पडत असते. या ठिकाणाचा दुसरा पौराणिक संदर्भ कवी प्रभूरामचंद्र वनवासात असताना या किल्ल्यावर त्यांनी काही दिवस मुक्काम केला होता. या ठिकाणी प्रभूरामाची शेज (शय्या) म्हणूनच या किल्ल्याचं नामकरण हे ‘रामशेज’ असं झालेलं.
आम्ही नाशिक पार करून आशेवार्ड गावात आलो समोरच रामशेज मध्यम आकाराचा, पण भक्कम असा चहुबाजूंनी ताशीव कडे असलेला हा किल्ला आम्हाला आता खुणावू लागला होता. पायथ्यापासून तासाभरातच आम्ही राममंदिरासमोर उभे राहिलो. या मंदिरातली मूर्ती आणि गुहा या खरोखरीच डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या. गडावर असं काही अधिष्ठान असलं की, गडाचं पावित्र्यही आपोआप राखलं जातं 
दर्शनानंतर आम्ही मोर्चा वळवला तो थेट गडावरच. उद्ध्वस्त दरवाजातून आम्ही बरोबर गडाच्या मध्यभागी दाखल झालो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास दोन तास पुरले. यादरम्यान देवीचे एक मंदिर, पाण्याचे टाके, गडाचा मुख्य दरवाजा, गुहा पाहता आल्या. गडावर सुस्थितीतील वास्तू अशा नाहीच, परंतु तरीही या गडाच्या अंगाखांद्यावरून फिरताना जर इतिहासाचा चष्मा लावला तर हा गड बरेच काही सांगतो. त्या आठवणींना सोबत घेऊनच आम्ही परतलो

- ओंकार वर्तले
सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३

Wednesday, December 14, 2011

एक थोर अनुभव

किल्ले पुरंदर


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : १५०० मीटर/४६०० फूट


- भौगोलिक स्थान : तालुका पुरंदर, जिल्हा पुणे

- गडावर जायचे मार्ग : पायथ्याच्या नारायणपूर या गावातून दोन मार्गांनी पुरंदर. माचीवर जाता येते. एक वाट आहे डोंगरभटक्यांसाठी व दुसरी सर्वसामान्य जनतेसाठी जी पूर्वी लष्करी वाहनांसाठी बनवली होती

- गडावर पाहावयाची स्थळे : १) बिनी दरवाजा, २) पुरंदरेश्‍वर मंदिर, ३) रामेश्‍वर मंदिर, ४) कंदकडा, ५) केदारेश्‍वर मंदिर, ६) माची, ७) भैरवखिंड, ८) वज्रगड, ९) वीररत्न मुरारबाजी पुतळा, १०) पद्मावती तळे, ११) शेंदरी बुरुज, १२) राजगादी, १३) पेशव्यांचा वाडा, १४) गडावरची सुमारे ५० पाण्याची टाकी.

किल्ले रायगड

- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : ८५५ मीटर/२८५१ फूट

- भौगोलिक स्थान : तालुका महाड, जिल्हा रायगड

उत्तर अक्षांश : १८० १४ मिनिट पूर्व रेखांश : ७३० २० मिनिट

- गडावर जायचे मार्ग : १) मुंबई - गोवा महामार्गावरील महाड या गावापासून पायथ्याची रायगडवाडी सुमारे २६ कि.मी. आहे. चित् दरवाज्यापासून सुमारे १५०० पायर्‍या चढून गडावर जाता येते.

२) रायगडवाडीपासून नाना दरवाजातून जाणार्‍या शिवकालीन वाटेने गडावर जाता येते.

३) हिरकणीवाडीतील रोपवेने केवळ ४ मिनिटांतही गडावर जाता येते.

- रायगडाची प्राचीन नावे : रायरी, राजगिरी, तणस, रासिवटा, जंबुद्वीप, नंदादीप.

- गडावरचे पाहावयाची स्थळे : १) खुबलढा बुरुज, २) नाना दरवाजा, ३) महादरवाजा, ४) गंगासागर, ५) स्तंभ/मनोरे, ६) बालेकिल्ला, ७) बाजारपेठ, ८) होळीचा माळ - शिवपुतळा, ९) टकमक टोक, १०) दारूकोठारे, ११) जगदीश्‍वर मंदिर, १२) शिवसमाधी, १३) भवानी टोक, १४) बाराटाकी, १५) वाघदरवाजा, १६) हिरकणी बुरूज, १७) शिरकाई मंदिर.

विजयी विजयदुर्ग

- किल्ल्याचा प्रकार : मिश्रदुर्ग (जलदुर्ग व भुईकोट यांचा सुंदर मिलाप)

- भौगोलिक स्थान : तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग

- गडावर जायचे मार्ग : डांबरी सडकेने हा किल्ला सहजसाध्य आहे.

जलमार्गानेही किल्ल्यावर जाता येते.

- गडावर पाहावयाची स्थळे : १) तीन प्रवेशद्वारे २) तळघर ३) चिरेबंदी जलाशय ४) अनोखे बुरूज व तिहेरी तटबंदी ५) साहेबाचे ओटे ६) जाखिणीची तोफ ७) दारूकोठार.

किल्ले प्रतापगड


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला),

उंची : १०८० मीटर/३५४३ फूट

- भौगोलिक स्थान : तालुका जावळी, जिल्हा सातारा

- गडावर जायचे मार्ग : पोलादपूर - महाबळेश्‍वर रस्त्यावरील वाडा या पायथ्याच्या गावातून डांबरी सडकेने थेट गडापर्यंत पोहोचता येते. (४ कि.मी.)

- गडावर पाहावयाची स्थळे : १) महादरवाजा, २) भवानी मंदिर, ३) टेहळणी बुरूज, ४) हनुमान मंदिर, ५) केदारेश्‍वर मंदिर, ६) सदर, ७) शिवपुतळा,

८) राजपहार्‍याची दिंडी व त्यावरील घोरपडीचे शिल्प, ९) यशवंत बुरूज, १०) चिलखती बांधणीची तटबंदी

किल्ले राजगड

- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : १३९४ मीटर/४६०० फूट

- भौगोलिक स्थान : तालुका वेल्हा, जिल्हा पुणे

- गडावर जायचे मार्ग : १) पायथ्याच्या वाजेघर गावातून, बाबुदाच्या झापापासून डोंगरधारेने चोरदरवाजा व मग पद्मावती माचीवर, २) पाली खुर्द गावातून पायर्‍यांच्या वाटेने पालीदरवाजातून पद्मावती माची, ३) पायथ्याच्या गुंजवणे गावातून अवघड वाटेने गुंजवणे दरवाजातून गडावर, ४) भुतोंडे गावातून अळुदरवाज्याने संजीवनी माची. शिवधर घळीतूनही गोप्याघाटाने अळू दरवाजातून गडावर येण्याचा मार्ग आहे, ५) तोरणा-राजगड डोंगरधारेने खडतर वाट चालून संजीवनी माचीवर येता येते.

गडावर पाहावयाची स्थळे : १) पद्मावती माची, २) पद्मावती मंदिर, ३) पद्मावती तळे, ४) रामेश्‍वर मंदिर, ५) राजवाडा, ६) सदर, ७) अंबरखाना, ८) गुंजवणे, पाली दरवाजा, ९) बालेकिल्ला, १०) सुवेळा माची, ११) संजीवनी माची, १२) काळेश्‍वरी बुरूज व परिसर, १३) अळू दरवाजा इत्यादी.

किल्ले शिवनेरी


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला)

- उंची : ११०० मीटर/ ३५०० फूट

- भौगोलिक स्थान : तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

- गडावर जाण्याचे मार्ग : पायथ्याच्या जुन्नर गावातून गडावर जायला दोन मार्ग आहेत.

१. सात दरवाज्यांच्या मालिकेतून पायर्‍यांच्या वाटेने, मार्गातील सात दरवाजे : महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलाबकार दरवाजा.

२. शिवनेरीच्या दक्षिण कड्यात कोरलेल्या गुहा व लेण्यांना कवेत घेऊन वर चढणारी साखळीची अवघड वाट.

किल्ले सिंधुदुर्ग

- किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग (पाण्यातला किल्ला)

- भौगोलिक स्थान : तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.

- गडावर जायचा मार्ग : मालवण हे गाव मुंबई - गोवा हमरस्त्यापासून अगदी जवळ आहे. मालवणमधून छोट्या नावांमधून किल्ल्यावर जाण्याची सोय आहे.

- गडावर पाहावयाची स्थळे : १) महादरवाजा २) दोन फांद्यांचे नारळाचे झाड ३) शिवराजेश्‍वर मंदिर ४) शिवरायांची हस्तपद चिन्हे ५) दूधबाव, दहीबाव व साखरबाव ६) राणीचा वेळा ७) दर्याबुरूज.

- गडावर पाहावयाची काही प्रमुख स्थळं : १. सात दरवाजे, २. शिवजन्मस्थान आणि शिवाई मंदिर, ३. शिवकुंज, ४. गंगा जमुना टाके, ५. अंबरखाना, ६. कोळी चौथरा, ७. बदामी तळ, ८. कडेलोट टोक. अष्टविनायकातील लेण्याद्री, नाणेघाट, जीवधन-हडसर-चावड-निमगिरी आदी गिरिदुर्ग, कुकडी नदीचा उगम आणि पूर गावचे कुकडेश्‍वराचे प्राचीन व कलासंपन्न शिवमंदिर, शिवनेरीच्या पोटातील आणि भीमाशंकर, तुळजा, अंब-अंबिका गटात मोडणारी असंख्य कोरीव लेणी, वडज-पिंपळगाव-येडगाव-माणिकडोह आणि डिंभे धरणाचे जलाशय, खादेड येथील जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बिण.

- पराग लिमये

सौजन्य:- फुलोरा, सामना १०१२२०११