आम्ही नेहमीच तिथे जात असतो तिथला इतिहास, भूगोल आणि धार्मिकतेचा संदर्भ हे विचारतच फिरत असतो. त्यामुळे आमच्या ज्ञानात नेहमीच भर पडत असते. या ठिकाणाचा दुसरा पौराणिक संदर्भ कवी प्रभूरामचंद्र वनवासात असताना या किल्ल्यावर त्यांनी काही दिवस मुक्काम केला होता. या ठिकाणी प्रभूरामाची शेज (शय्या) म्हणूनच या किल्ल्याचं नामकरण हे ‘रामशेज’ असं झालेलं.
आम्ही नाशिक पार करून आशेवार्ड गावात आलो समोरच रामशेज मध्यम आकाराचा, पण भक्कम असा चहुबाजूंनी ताशीव कडे असलेला हा किल्ला आम्हाला आता खुणावू लागला होता. पायथ्यापासून तासाभरातच आम्ही राममंदिरासमोर उभे राहिलो. या मंदिरातली मूर्ती आणि गुहा या खरोखरीच डोळ्यांचे पारणे फेडणार्या. गडावर असं काही अधिष्ठान असलं की, गडाचं पावित्र्यही आपोआप राखलं जातं
दर्शनानंतर आम्ही मोर्चा वळवला तो थेट गडावरच. उद्ध्वस्त दरवाजातून आम्ही बरोबर गडाच्या मध्यभागी दाखल झालो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास दोन तास पुरले. यादरम्यान देवीचे एक मंदिर, पाण्याचे टाके, गडाचा मुख्य दरवाजा, गुहा पाहता आल्या. गडावर सुस्थितीतील वास्तू अशा नाहीच, परंतु तरीही या गडाच्या अंगाखांद्यावरून फिरताना जर इतिहासाचा चष्मा लावला तर हा गड बरेच काही सांगतो. त्या आठवणींना सोबत घेऊनच आम्ही परतलो
- ओंकार वर्तले
सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३
No comments:
Post a Comment