रामेठा ही विषारी वनस्पती आहे. अर्थात तिच्यातला हा विषारीपणा स्व-संरक्षणासाठी असावा. हिच्या पानांचा चीक डोळ्याला लागल्यास इजा होते. खोडावरच्या सालीतल्या राळेमुळे कातडीवर फोड येतात. साल आणि पानं जहाल विषारी असल्याने मासेमारीकरता वापरतात. कागद निर्मितीत कच्चा माल म्हणून सालीचा उपयोग होतो.
आदिवासी जळणासाठी लाकूड म्हणून रामेठाचे लाकूड वापरतात. जळलेल्या लाकडाच्या कोळशावर आदिवासी बायका आकोटाची मिस्री भाजतात. त्यात या लाकडाची राख मिसळली जाते. अशी राखमिस्रीत मिस्री लावल्याने अनेक महिलांचे दात झिजलेत, पडलेत.आयुर्वेदात हिचा ‘दातपाडी’ म्हणून उल्लेख असल्याचे मित्राने सांगितले. रामेठामध्ये ग्लुको पायरीनोसासाईड, नायट्रोफिनाईल ही अल्कोलाईड (विषारी पदार्थ) आहेत. जाणकार आदिवासी हिची पाने सुजेवर किंवा मुक्या मारावर इलाज म्हणून लावतात. अस्थमा, अपचन यावर ही गुणकारी आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये उपचार म्हणून तिच्या वापराला १०० वर्षांची परंपरा आहे. बाजारात विकायला नेताना आदिवासी लोक गुरांच्या अंगाला रामेठयाचा पाला चोळतात. त्यामुळे गुरं मस्त गुटगुटीत दिसतात.
- भाऊसाहेब चासकर
सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०११४
No comments:
Post a Comment