वडील दर श्रावण महिन्यात "नवनाथ भक्तिसार" ग्रंथाचे पठण करीत असत. आणि, त्यांची खूप इचछा होती कि, नवनाथांची गाथा कोणत्या ना कोणत्या तरी चॅनेल वर किंवा कुणीतरी ह्यावर धारावाहिक किंवा चित्रपट तयार करावा.
गेल्या वर्षी जेव्हा "सोनी मराठी" टीव्ही चॅनेल सुरु झाले तेव्हा मनात एक आशा निर्माण झाली होती, कि सोनी मराठी चॅनेलने नवनाथांवर धारावाहिक बनवली पाहिजे, कारण, सोनी टीव्ही चा इतिहास पाहता, एक गोष्ट लक्षात आली होती, ती म्हणजे धार्मिक धारावाहिक सादर करण्याची जी कला व तंत्रज्ञान सोनी कडे आहे, त्यामुळे बरेच ग्राहक ह्या धारावाहिक ना प्रचंड प्रतिसाद देतात.
नवनाथांचा पण एक संप्रदाय आहे. जो भक्त नाथांचीच भक्ती करतो. पण, ह्या संप्रदायाने कधीही भक्तीचे बाजारीकरण केले नाही. किंवा, नवनाथांबद्दल सहसा कुठे ऐकायला मिळत नाही. पण, एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्यांनी, "नवनाथ भक्तिसार" ग्रंथाचे पठण वा श्रवण केले आहे, त्यांच्या मनात नाथांबद्दल एक शुद्ध श्रद्धा आहे.
अर्थात, आता सोनी मराठी हि धारावाहिक सलग कथानकाच्या रूपाने सादर करते कि, लहान लहान कथांद्वारे सादर करते, हे बघणे औत्स्युक्याचे ठरेल. सलग कथानकाच्या रूपाने सादर केल्यास, धारावाहिकचा प्रभाव दर्शकांवर जास्त पडेल अशी आशा आहे.
आता, अगदी मीडियाच्या भाषेत सांगायचे झाले तर ह्या कथानकात फँटसी पण आहे. तसेच, विज्ञानाला आव्हान देणाऱ्या काही घटना देखील आहेत. देवांना पण झालेला गर्व नाथांनी कश्या प्रकारे मोडीत काढला तेही आहे. ह्या कथानकातून काही नवीन शब्द पण दर्शकांना समजणार आहे. पुढील काही मुद्द्यांवरून ह्या कथानकाचे महत्व पटेल.
१. नाथांनी स्त्रीच्या पोटातून जन्म घेतलेला नाही. सर्व नाथांचा जन्म हा "अयोनी संभव" आहे. फक्त, मीननाथांचा जन्म हा आईच्या पोटातून झाला होता, पण नंतर घडलेल्या घटनेने त्यांचा पुनःजन्म हा "अयोनी संभव" आहे.
२. गोरक्षनाथ व जालिंदर नाथांच्या भेटीत झाडावरील आंबे पुन्हा झाडावर त्याच फांदीला जोडणे हि घटना विज्ञानाला आव्हान देणारी आहे.
३. गुरुभक्ती चे अतिउच्च दर्शन गोरक्षनाथांनी दिले आहे. आपल्या गुरूंना आवडणारे वडे आणून देण्यासाठी आपला डोळा त्यांनी दान केला होता.
४. पूर्वी स्त्री राज्य होते, व त्याचे रक्षक श्री बजरंगबली होते. आणि, ह्याच बजरंग बळींना दोन्ही नाथांनी हरवले होते.
५. जगदंबा मातेला झालेला गर्व पण मच्छिन्द्रनाथांनी मोडीत काढला होता.
६. सावत्र आईने मुलाला हात पाय कापून एक तप एकाच जागी चौरंगी करून बसवले होते, तेच पुढे चौरंगीनाथ म्हणून नावारूपास आले.
७. भर्तरीनाथांना प्राण्याची भाषा कळत असे.
८. अर्जुनाचे स्त्री रूप सर्वाना ठाऊक आहे, पण गोरक्षनाथांनी आपल्या गुरूंना स्त्री राज्यातून परत आणण्यासाठी घेतलेले स्त्री रूपाचे महत्व खूप मोठे आहे.
९. कानिफनाथांनी आपल्या गुरूंना जमिनीत कुठे पुरले होते, हे शोधून काढलेले आहे.
१०. वटसिद्धनागनाथानी एका ब्राह्मणाच्या बारा मुलांचे प्राण यमाकडून परत आणले आहेत.
११. गहिनीनाथांचा जन्म हा मातीच्या पुतळ्यातून झालेला आहे.
"अनुग्रह", "अयोनी संभव", "आदेश", "संजीवनी मंत्र" अश्या अनेक नवीन शब्दांचा अर्थ दर्शकांना समजणार आहे.